नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

54

मुंबई / प्रतिनिधी :  पतंप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. आज आणीबाणीला ४३ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुंबई भाजपने एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता पंतप्रधान एशियन पायाभूत गुंतवणूक बँकेच्या वार्षिक सभेला संबोधित करतील. यावेळी आणीबाणीविरोधात लढा देऊन लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होणाऱ्या या कार्यक्रमात मोदी यांचे प्रमुख भाषण होणार आहे.

26 जून 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. काँग्रेसची ही दुखरी नस दाबून कोंडी करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. 26 जूनला आणीबाणीला 43 वर्ष पूर्ण होत असून या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आणीबाणीविरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व लोकशाही मूल्यांची चर्चा करण्यासाठी प्रदेश भाजपने खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या विचारमंथन सभेत ते लोकशाही मूल्यांविषयीचे आपले विचार व्यक्त करतीलच, पण याच विषयावर पक्षाच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांची मते कार्यकर्त्यांसमोर येतील. पंतप्रधान मोदी हे या विचारमंथन सभेतील प्रमुख संवादक असतील, असे अतुल शहा यांनी म्हटले आहे.