‘फर्जंद’ एक अविस्मरणीय शौर्यगाथा..

423

शब्दांकन / नारायण परब : फर्जंद हा चित्रपट म्हणजे शुरवीर मावळ्यांची शौर्यगाथा, फर्जंद म्हणजे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील मावळ्यांची श्रद्धा, फर्जंद म्हणजे आऊसाहेब जिजाऊ आणि महाराजांचं मावळ्यांवरील प्रेम, फर्जंद म्हणजे पन्हाळा सर करणारा शुर यौध्दा असं असंख्य शब्दांमध्ये फर्जंदच वर्णन करता येईल.

काही वेळा एखाद्या गोष्टीवर काय लिहावं हे कळतं नाही तर काहीवेळा अशा कलाकृतीवर किती लिहावं आणि काय लिहावं यासाठी शब्द अपुरे पडतात. फर्जंद ही अशीच भव्यदिव्य आणि शिवकाळ डोळ्यांसमोर उभी करणारी कलाकृती. आज सकाळी प्लाझा थिएटरला हा चित्रपट १९ शिवप्रेमींसोबत पाहिला. इतक्या मोठ्या ग्रुपसोबत चित्रपट पाहणं तेही शिवप्रेमींसोबत खरंच फार अप्रतिम अनुभव होता. हाऊसफुल्ल असलेल्या शोमध्ये शिवरायांचा जयघोष, प्रत्येक महत्त्वाच्या संवादाला टाळ्या,आवाज असं शिवमय थिएटरच वातावरण होत.

या चित्रपटाचं कथानक आहे पन्हाळ्याच्या मोहीमेवर आधारीत. शिवराज्याभिषेक अगोदर हा किल्ला स्वराज्यात सामील होणं हे स्वराज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. यवनांनी स्वराजातील पळवून नेलेल्या स्त्रीयांना ही याच किल्ल्यावर ठेवले असल्याने महाराजांना हा किल्ला त्या महिलांच्या सुटकेकरिता जिंकायचाच आहे. या मोहीमेकरीता सरदार कोंडाजी फर्जंद यांची निवड केली जाते. आऊसाहेब जिजाऊ मात्र अशा मोहीमाकरुन आमची मुलं गमवायची नाही आहेत अशा मनःस्थितीत असतात. मात्र कैदेतील स्रीयांकरिता आणि कोंडाजी फर्जंदच्या जिद्दीमुळे या मोहिमेस होकार देतात.फक्त ६० मावळ्यांसह २५०० यवनांचा पराभव करुन ही मोहिम फर्जंद फत्ते करतात आणि इतिहास घडवितात. इतक्या कमी फौजेसह २५०० शत्रुचा पराभव केला हे जगाच्या इतिहासातील एकमेव उदाहरण आहे. फर्जंद चित्रपट हा मराठीतील एक उत्कृष्ट युद्धपट आहे.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी अक्षरशः शिवकाळ डोळ्यांसमोर उभा केलाय. लेखक म्हणूनही कथानकाची मांडणी उत्तम केली आहे. vfx आणि graphics उत्तमरित्या वापरले आहे. यासर्वबांबीमुळे चित्रपटाला भव्यदिव्य स्वरुप आले आहे. खरच दिग्पाल तुम्हाला मानाचा मुजरा. जिजाऊ साहेब मृणाल कुलकर्णी यांनी अतिशय उत्तमरीत्या साकारल्या आहेत. चिन्मय मांडलेकर यांनी जीव ओतून महाराज साकारले आहेत हे दिसतं. अभिनेता अंकित मोहन यांनी कोंडाजी फर्जंद या भुमिकेला योग्य न्याय दिला आहे. अंगमेहनत आणि मराठी भाषिक नसुनही त्याकाळातील मराठी भाषा त्याचा लहेजा पकडला आहे. खरच मोहन तुमचं कौतुक. अजय पुरकर, आस्ताद काळे, मृण्मयी देशपांडे, हर्षद दुधाणे, निखिल राऊत,प्रविण तरडे, नेहा जोशी यासर्वांनी आपल्या भुमिकेला योग्य न्याय दिला आहे.

गणेश यादव आणि अंशुमन विचारे यांची अगदी लहान भुमिका ही लक्षात राहते. समीर धर्माधिकारी यांनी बेशक खान हा खलनायक ताकदीने उभा केलाय.विशेष कौतुक आहे प्रसाद ओक यांच बहिर्जी नाईक यांच ७ वेषातील बहुरुपी पात्र जीवंत केले आहे. सर्व कलाकारांना सलाम. फर्ज़ंद प्रत्येक शिवप्रेमींनी, मराठी माणसांनी आवर्जून थिएटरला पहावा आणि राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि शुरवीर मावळ्यांच्या चरणी नतमस्तक व्हावे. हा चित्रपट इतिहास घडवणार यात शंका नाही. जय जिजाऊ जय शिवराय.