ट्रेनमधला ‘ती’ चा संघर्ष…

113
शब्दांकन / कृष्णा सोनारवाडकर : मी रोज ऑफिससाठी घरातून बाहेर पडतो, प्रवास तसा ट्रेनचा हा ठरलेलाच असतो कितीतरी सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी ट्रेन प्रवासात अनुभवायला मिळतात.त्यात थोडीशी जागा मिळाली की बसायला मिळत.गरजेपुरती हवा देणाऱ्या पंख्याखाली बसल्या बसल्या कुठल्यातरी स्टेशनवर टाळी वाजवत एक दोन पात्र ट्रेनमध्ये चढतात.त्यांना पाहिल्यानंतर लगेचच सगळ्यांचे चेहरे पडले असल्याचं जाणवत.’किन्नर’म्हणून हिनवण्यापलिकडे आपण माणूस म्हणून त्यांच्याकडे कधी पहिलच नाही.दिवसेंदिवस यांची संख्या वाढत  आहे आणि पोटासाठी म्हणून मग नाईलाजाने भीक मागावी लागते.या भीक मागायला पण काही कारणे आहेत ती कारणे म्हणजे एकतर सहजासहजी त्यांना कुठे काम मिळत नाही आणि मिळाल तरी हपापलेल्या  वासनांच्या डोळ्यांचे बळी पडल्याशिवाय ते राहत नाहीत हे वास्तव आहे जे सगळ्यांनी मान्य करायलाच हवं.मानसिक,शारीरिक आणि अनेक प्रकारचे त्रास सहन करत समाजाविरुद्ध हा ‘किन्नर’ लढा देतो आहे.
  मी दररोज ट्रेनने प्रवास करतो.. ट्रेनच्या प्रवासात यांचं जगण मी पाहत आलोय आणि आता त्याची स्थिती समजू लागतोय.ट्रेनच्या एखाद्या सीटवर बसून कधीतरी यांच्याकडे काळजीपूर्वक पाहातो सुरुवातीला जवळ येऊन हात पसरतात मागून लगेच मिळत नसेल तर हाताने हलवून समोरच्या माणसाला पैसे देण्यासाठी जाग करून बघतात आणि तरीदेखील जर कोणतीच प्रतिक्रिया येत नसेल तर मात्र पुढच्या व्यक्तीकडे जाणं त्यांना भाग असत. पण ते ज्या ज्या वेळी लोकलमध्ये पैसे मागण्यासाठी लोकांच्या गराड्यात हात पसरत असतात तेंव्हा सगळ्यांच्या नजरा  या त्यांच्यासाठी सहानुभूतीचा नसतात हे तुम्हाला नक्कीच जाणवेल. 
   काही दिवसांपूर्वी प्रवासादरम्यान एक गोष्ट लक्षात आली.एक ‘किन्नर’ नेहमीप्रमाणे  लोकलमध्ये महिला आणि पुरुषांकडे पैसे मागत होता.काहीजण पैसे काढून देतही होते पण काहीजण असेही होते की नुसते डोळे वटारून त्याला पुढे जाण्यासाठी सांगत होते तर त्यातल्याच काहीजणांच्या वखवखलेल्या नजरा त्याच्या शरीराकडे पाहत होत्या दोन स्टेशन्स गेली असतील तो उतरण्याच्या  तयारीत दरवाजाकडे जाण्यासाठी निघाला अचानक माझ्या मनात काय विचार आला कोणास ठाऊक म्हटलं रोज आपण यांचं जगणं, वागणं पाहतोय खरे पण यांना समजून घायला हवं यांचे अनुभव समजून घ्यायला हवेत म्हणून मीसुद्धा त्याच्यापाठोपाठ त्याच स्टेशनवर उतरायचं म्हणून खाली उतरलो दोन मिनिटं झाली असतील मी त्याला हाक मारली.दोन चार मिनिट का होईना पण त्याच्याशी बोलायचं असं ठरवलं होतं मी. हाक मारल्या मारल्या तो फिरकला आणि माझ्यापाशी आला आणि बोलायला काय “बोल क्या हुआ”. मी त्याला विचारलं तुला मराठी येते का त्यावर त्याच उत्तर मला अपेक्षेप्रमाणे मिळालं होतं तो महाराष्ट्रीयन च होता.त्याला मी विचारायला सुरुवात केली कधीपासून करतोस हे काम?? हे काम करताना लाचारीचा अनुभव येत असेल ना??माणसांच्या वागण्याचा बदल हि जाणवत असेल?? असे दोन चार प्रश्न आपुलकीने विचारल्यावर मात्र त्याच्या चेहऱ्यावर थोडस समाधान दिसत होतं.त्याने दिलेली उत्तर त्याच्याच शब्दात देतोय..
   ” साधारण चार वर्षांपूर्वी मी मुंबईत आले.मुंबई माझ्यासाठी नवीन होती माझ्या शरीरात झालेले बदल आणि हे जगण पूर्णपणे नवखं होत पण दुसरं काही काम करूही शकत न्हवते.सुरुवातीला किन्नर लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला पण जड जात होत म्हणून ते लोकलमध्ये ज्या ज्या वेळी मागायला जात त्यावेळी मी त्यांच्यासोबत फिरू लागले ते कसे मागतात लोकांशी कसे वागतात ते अनुभवत गेले आणि हळूहळू माझ्यात हिम्मत अली.मनाला पटत नसतानाही मजबुरीपोटी लोकांसमोर हात पसरायला लागले.कधीकधी हातात पैसे पडत होते तर कधी रिकाम्या हातापोटीच राहावं लागतं होत.पैसे कमवण्याचा दुसरा कोणता पर्याय सुद्धा न्हवता मग रोज लोकलच्या गर्दीत मन मारून घुसू लागले हळू आवाजात,आणि नम्रतेने पैसे विचारल्यावर लोक जवळ उभसुद्धा करून घेत नाहीत म्हणून थोड्या चढ्या आवाजात भीक मागायची वेळ आली. आकर्षक दिसण्यासाठी लिपस्टिक आणि तोंडभरून पावडर आणि कपडे घालायची पद्धत सुद्धा बदलावी लागली. पण आता सवय झालीय पण या रोजच्या प्रवासात सगळे च लोक प्रामाणिक आणि समजूतदार मनाने  कधी पैसे देतात असहि नाहीये वेळेनुसार आम्हाला स्वभाव बदलावा लागतो.कधीतरी कोणीतरी भेटत विचारपूस करतात कुठली आहेस,कधीपासून हे काम करते,वैगेरे वैगेरे पण नशिबाला आलेलं जगण कोणी काढून घेणार आहे का ते तर मलाच भोगावं लागणार आहे.”
     हे सगळे अनुभव मनाला स्पर्श करणारे आहेत. साधारण तीन वर्षांपूर्वी मुंबईत दाखल झालेल्या “परीला” आता या गोष्टींची सवय पडलीय अश्या भरपूर पऱ्या आहेत ज्या पोट भरण्यासाठी बरेवाईट सगळे अनुभव रिचवत सुखदुःखे भोगत मुंबईच्या लोकलमध्ये जगताना दिसतील. पण मुंबईच्या लोकलमध्ये भीक मागता मागता आलेल्या न विसरणाऱ्या क्षणांची आठवण सुद्धा परीने करून दिली ती सांगत होती आणि मी शांत स्तब्ध होऊन ऐकत होतो. आपल्या प्रत्येकासाठी आयुष्य खूप मोठं आहे पण कित्येक जणांचं आयुष्य हे दुखांनी भरलेलं असत अगदी बोचऱ्या काट्याप्रमाणे  क्षणाक्षणाला आठवण करून देणार….पण आम्ही आमच्या आयुष्यातल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करून रडत बसतो.म्हणून म्हटलं याच विषयावर लिहू.. जगण्यापलिकडंच जगणं जगणारा ‘किन्नर’…….